गंगाराम आढाव जालनामराठी साहित्य क्षेत्रातील नव कवि आणि लेखकांनी सामाजिक विषयांना भिडले पाहिजे. त्यातून अंगारयुक्त पण सृजनशील साहित्य निर्मितीसाठी सिद्ध बनले पाहिजे असे प्रतिपादन शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसोहब ढवळे यांनी केले.बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जालना, भाषा साहित्य,संस्कृती व संशोधन परिषद बदनापूर आणि उत्कर्ष वाङमय मंडळ बदनापूरच्या वतीने पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन नाट्यलेखक व सिने अभिनेते राजकुमार तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. ढवळे, आ. नारायण कुचे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, शाहीर अण्णा गाडगे, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, पांडुरंग जऱ्हाड, जयप्रकाश चव्हाण, संजय जगदाळे उपस्थित होते.प्रा. ढवळे म्हणाले की, आजचे मराठी साहित्य सृजनात्मक कमी आणि बव्हंशी प्रतिक्रियात्मक बनले आहे. त्यामुळे साहित्य साहित्य म्हणून तरत नाही. नव्या पिढीला, वाचकांना साहित्यांचा लळा लागत नाही. साहित्य निर्मिती किंवा लेखन कला म्हणजे एक आत्मशोध असतो. त्यासाठी प्रचंड निरीक्षण आणि वाचन साधनेची गरज असते.जीवनाच्या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि दहशतवाद ही आमची जागतिक समस्या बनली आहे. अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आज अन्य गोष्टींचे महत्व कमी करून साहित्य संस्कृतीच्या अध्ययनाला महत्व देत असल्याचे सांगून आपल्या देशात प्राचीन मध्ययुगीन, आधुनिक युग आणि त्याचे प्रतिनिधी एकाच घरात सुखाने नांदताना आढळतात. मात्र आता घर घर राहिले नाहीत, लॉजिग - बोर्डींग झालेले आहे हे नाकारून कसे चालणार, समाजातील दरी वाढविणारे हे दंद्व आमचे साहित्य कसे हाताळणार, हा खरा प्रश्न आणि आव्हान आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अंतर्मुख होवून आधुनिक साहित्यांची वैशिष्ट्य मराठी लेखकांना पचवावी लागतील तरच आम्हाला नव्या वाटा चोखळता येतील. दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी इ. वाङ्मय प्रवाहात शेती, मातीवर अवलंबून असलेला आमचा मोठा समाज आहे. ही मोठ्या प्रमाणात साहित्य परिघाबाहेर आहे. गटशेती, बचतगट चळवळ, अॅट्रॉसिटी, माहितीचा अधिकार, महिला कायदे, सक्षमीकरण आदी सामाजिक विषय नव कवि आणि लेखकांना भिडले पाहिजे. त्यातून त्यांनी अंगारयुक्तपण सृजनशील लेखनासाठी सिद्ध बनले पाहिजे, असे आवाहन करून नवलेखकांना लिहिते होण्याची गरज प्रा. डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रख्यात नाट्य लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास विषद करत, नवलेखकांनी कोणत्याही विषयावर लिहते झाले पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सृजनात्मक साहित्य निर्मिती व्हावी
By admin | Published: February 26, 2017 12:46 AM