औरंगाबाद : जगभरातील प्रत्येक क्रांतीचा निर्माता असणाऱ्या मध्यमवर्गाची विश्वासार्हता घसरली आहे. तो सत्याच्या पाठीशी उभा राहत नाही. प्रसारमाध्यमांबरोबरच लोकशाहीत असलेल्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांचेही अंध:पतन झाले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी केले.
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात संत जनाबाई व्यासपीठावर पहिला परिसंवाद ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे’, या विषयावर घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जयदेव डोळे होते. परिसंवादात ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील, उस्मानाबाद येथील रवींद्र केसकर आणि नांदेड येथील वैजीनाथ अनमुलवाड हे सहभागी झाले होते. यावेळी डोळे म्हणाले, समाजातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक हा मध्यमवर्ग असतो. या मध्यमवर्गाला कोणत्याही गोष्टीचे वावडे राहिले नाही. सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात हा मध्यमवर्ग काहीही बोलत नाही. पूर्वी डावे, उजवे आणि तटस्थ असा प्रकार होता. आता असा काही प्रकार राहिला नाही. सत्य आता शोधावे लागत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता लयाला पोहचली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी रवींद्र केसकर यांनी विविध राष्ट्रीय संस्थांचे हवाले देत प्रिंट मिडियाची विश्वासार्हता ६२ टक्के असल्याचे सांगितले. आजही प्रसारमाध्यमांमध्ये अनेक विश्वासार्ह गोष्टी आहेत. त्यासाठी पैसे देऊन माहिती घेण्याची तयारी श्रोते, नागरिकांना ठेवली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. वैजनाथ अनमुलवाड यांनी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे. मात्र, त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोहर शिरसाट यांनी केले. आभार आशा डांगे यांनी मानले.
चौकट,
प्रादेशिक वृत्तपत्रांची विश्वासार्हता टिकून
यावेळी बोलाताना ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात काही जागितक स्तरावरील नामांकित संस्थांनी प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर सर्वेक्षण केले होते. त्यात वृत्तपत्रांची विश्वासार्हत ६२ टक्के दाखविण्यात आली. त्याचवेळी फ्रीडम ऑफ भारत प्रेसमध्ये १४२व्या आणि पाकिस्तान १४५ व्या स्थानी होता. तेव्हा केंद्र शासनाने एक समिती नेमली. त्या समितीमध्ये असलेले पी. साईनाथ यांनी देशभरात पत्रकारांच्या झालेल्या हत्यांचा मुद्दा मांडला होता. याकडेही जनतेने लक्ष वेधले पाहिजे. सध्या प्रादेशिक स्तरावरील वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या प्रकरण एका वार्ताहराने बाहेर काढल्यामुळेच डॉक्टर मुंडेला शिक्षा होऊ शकली. त्या वार्ताहाराच्या पाठीमागे ताकद उभा केल्यामुळेच हे घडल्याचेही पाटील यांनी सांगितले.