हिंगोली: शहरातील जवळपास १३५ घरकुल लाभार्थ्यांची कामे अंतिम झाली असतानाही त्यांना तिसऱ्या हप्त्याचा धनादेश मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून हे लाभार्थी न.प.चे खेटे घालत आहेत.शहरात नगरपालिकेकडून जवळपास ४00५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शासन उद्दिष्टाप्रमाणे व निकषात बसणाऱ्या लाभार्थिंची यात निवड करण्यात आली. यापैकी १६00 घरकुलांचे काम चालू आहे. त्यातील काही कामे अंतिम झाली असून काही अंतिम होण्याच्या मार्गावर आहेत. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिसरा हप्ता द्यायचा नाही, असा नियम घालून दिल्याने अनेकांनी उसनवारी करून आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले. काहींनी तर ऐनवेळ साहित्याअभावी काम थांबू नये म्हणून व्याजानेही रक्कम काढली. त्यातच शासनाकडून केवळ सव्वा लाखाची रक्कम लाभार्थीस मिळते. त्यामुळे दोन हप्ते प्रत्येकी ४0 हजारांचे तर तिसरा ४५ हजारांचा अशी विभागणी करण्यात आली आहे. अग्रीम म्हणून व काही काम झाल्यानंतर पूर्वीची रक्कम देण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांनी कामेही वेगात केली. आता तिसरा हप्ता काम पूर्ण केल्यावर मिळणार असल्याने त्या आशेने कामही पूर्ण केले. तरीही मागील सात महिन्यांपासून रक्कम मिळत नाही. काही दिवसांपूर्वी शासन या घरकुल योजनेत वाढीव रक्कम मंजूर करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले नाही, अशांनाच याचा लाभ मिळणार होता. त्यामुळेही काहींनी अंतिम झालेली कामेही दाखविली नव्हती. तर नंतर ही आशा मावळू लागल्याचे दिसताच लाभार्थींनी पालिकेकडे रेटा लावण्यास प्रारंभ केला. पालिकाही रक्कम देण्यास तयार आहे. मात्र तंत्रनिकेतन विद्यालयामार्फत तपासणीअंती काम पूर्ण झाल्याचा अहवाल असल्याशिवाय रक्कम देता येत नाही. ही बाब अडचणीची ठरत आहे. तपासणीच नसल्याने धनादेश काढले जात नाहीत. त्यामुळे लाभार्थी खेटे मारून हैराण आहेत.(वार्ताहर)
घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश अडकले
By admin | Published: September 23, 2014 11:05 PM