उस्मानाबाद : घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्या व्यवसायिकांविरोधात शनिवारी महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली़ याप्रकरणी ९० जणाविरूध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून १४५ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत़ तर वाशी, कळंब, भूम व उमरगा तालुक्यात महसूलने कारवाई केली, मात्र अद्यापपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़महसूल प्रशासनाने शनिवारी जिल्हाभरात घरगुती गॅसचा व्यवसायासाठी अवैधरीत्या वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरूध्द जोरदार मोहीम राबविली़ यात उस्मानाबाद शहरात १७ ठिकाणी केलेल्या कारवाईत ४३ गॅस सिलेंडर, वडगाव येथे चौघाविरूध्द केलेल्या कारवाईत ५ गॅस सिलेंडर, येडशी येथे १० जणांविरूध्द केलेल्या कारवाईत २४ गॅससिलेंडर, ढोकी येथे नऊ व्यवसायिकांकडून १५ गॅस सिलेंडर, केशेगाव येथे सात जणाविरूध्द तर बेंबळी येथे दोघाविरूध्द केलेल्या कारवाईत २० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले़ लोहारा महसूल विभागानेही सात सिलेंडर जप्त करून पाचजणांविरूध्द गुन्हे दाखल केले. तसेच तुळजापूर तालुक्यात राबविलेल्या मोहिमेत २६ हॉटेलात ३१ सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले. यावरून २६ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. यात ईटकळ, सलगऱ्यात प्रत्येकी सहा, सावरगाव, जळकोटमध्ये प्रत्येकी पाच, तुळजापूर, मंगरूळ, सलगरा येथे प्रत्येकी तीन सिलेंडर मिळून आले. प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यवसायासाठी घरगुती सिलेंडर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कळंब, वाशी, उमरगा व भूम तालुक्यातही ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली आहे़ मात्र, या तालुक्यांतर्गत एकाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कारवाईच्या तिसऱ्या दिवशीही संबंधितांवर गुन्हे दाखल न होण्यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)महसूलच्या मोहिमेमुळे हॉटेल, ढाबेचालकांत खळबळगुन्हे दाखल करण्याचे अधिकार पथक प्रमुखांना परंडा - जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी घरगुती गॅसचा वापर करणा-या व्यवसाय धारकावर विनिमय आपत्ती आणि विवरणच्या आदेश १९९३ व २००० मधील तरतुदी प्रमाणे फौजदारी स्वरुपाचा गुन्हा पोलीस स्टेशनला नोंदविण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार पथकाने शहरातील ३५ ठिकाणी धाडी मारुन तपासणी आठ सिलेंडर जप्त केले. सोमवारी पाच वाजेपर्यत या संबंधी गुन्हे दाखल झालेले नव्हते. दरम्यान, याबाबत पुरवठा अधिकारी पठाण यांना विचारले असता, पंचनामे करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे सर्वाधिकार पथक प्रमुखांना दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.धूम ठोकणाऱ्यांचे काय ?महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे समजताच मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांनी ढाबे, हॉटेल बंद करून धूम ठोकली़ कारवाई थंडावल्यानंतर त्यांनी पुन्हा छुप्या पध्दतीने घरगुती गॅसचा वापर सुरू केला आहे़ कारवाईतून बचावलेल्या अशा व्यावसायिकांवरही कारवाई होण्याची गरज आहे़फिर्यादीत हॉटेलचीच नावेमहसूल प्रशासनाने विविध हॉटेलवर कारवाई केली आणि हॉटेलच्याच नावाने फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे़ त्यामुळे पोलिसांना आता हॉटेलमालक शोधतानाही कसरत करावी लागत असल्याचे चित्र असून, यातून अनेक हॉटेलमालक बचावात्मक पवित्रा घेण्याची शक्यता आहे़
९० व्यवसायिकांवर गुन्हे
By admin | Published: July 14, 2014 11:58 PM