याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जीवन दत्तात्रय जाधव (रा. श्रीकृष्णनगर, उल्कानगरी) हे औषधी निरीक्षक आहेत. महिनाभरापूर्वी त्यांनी नूतन कॉलनीतील मे. अभिषेक एंटरप्रायजेस या औषधी दुकानातील सॅनिटायझरचे नमुने तपासणीकरिता नेले होते. प्रयोगशाळेत या नमुन्याची तपासणी केली असता सॅनिटायझरमध्ये इथेनॉलऐवजी मिथेनॉलचा वापर करण्यात आल्याचे त्यांना समजले. मिथेनॉल हे मानवी आरोग्यास धोकादायक आहे. असे असताना आरोपींनी हे सॅनिटायझर तयार केले आणि त्याची विक्री सुरू केल्याचे समोर आले. यानंतर जाधव यांनी आरोपींच्या एजन्सीमधील सॅनिटायझरचा साठा जप्त केला. ७० ते ७५ हजार रुपये किमतीचा हा साठा आहे. हे सॅनिटायझर कुणाकडून खरेदी केले याविषयी जाधव यांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी एका पुरवठादाराची पावती दिली. जाधव यांनी त्या पावतीतील पत्त्यावर जाऊन पाहिले असता तेथे तशी कोणतीही आस्थापना आढळून आली नाही. यामुळे या धोकादायक सॅनिटायझरचे निर्मिती करणारे कोण याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा होण्यासाठी जाधव यांनी शुक्रवारी क्रांतीचौक ठाणे गाठून याविषयी तक्रार नोंदविली.
धोकादायक सॅनिटायझर विक्री करणाऱ्या एजन्सीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:05 AM