औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी व्हास कॉल पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या लॅण्डलाईन नंबरवर १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आला होता. या कॉलमध्ये नाव सांगणाऱ्या दत्ता जाधव या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
शहर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन नंबरवर ००१३३०९६०१०१८ या क्रमांकावरून १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता एक व्हाईस कॉल आला होता. या हॉईस कॉलमध्ये ॲड. दत्ता जाधव असे नाव सांगून ' हायकोर्ट में पैसे देकर भी काम नही होता इसलिय मैने हायकोर्ट मे बॉम्ब रख दिया' अशी धमकीच दिली. या धमकीमुळे नियंत्रण कक्षाने बीडीडीएस पथक, सायबर आणि पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी खंडपीठाचा कोपरा ना कोपरा तपासून पाहिला. मात्र, काहीच आढळले नाही. त्यामुळे तो फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले.
व्हाईस कॉलमध्ये खंडपीठात वकील करणारे दत्ता जाधव यांचे नाव सांगून त्यांचा मोबाईल नंबरही देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या नंबरवर फोन करून चौकशी केली असता, ॲड. दत्तात्रय जाधव हे हायकोर्टातुन घरी पोहचले होते. त्यांना तात्काळ पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याठिकाणी त्यांची चौकशी केली असता, त्यांचे नाव घेऊन धमकीचा फोन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी नियंत्रण कक्षातील हवालदार महेंद्र गंगावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता जाधव असे नाव सांगणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत.