औरंगाबाद : विमानतळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून ६ बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये उकळणाऱ्या एका जणाविरोधात आर्थिक गुन्हेशाखेने सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविला.विक्रम सखाराम पवार (रा. नक्षत्रवाडी) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नांदेड येथील गोविंद केशवराव पुयेड हा तरुण बेरोजगार असून नोकरीच्या शोधात आहे. गतवर्षी जानेवारी २०१८ मध्ये वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये नांदेड येथे बँकेसाठी आणि औरंगाबादेतील विमानतळावर नोकरीची पदे भरणे असल्याचे वाचले. त्यानंतर गोविंद यांनी जाहिरातीमधील मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता गायत्री नावाच्या महिलेने आरोपी विक्रम पवार यास भेटण्याचे सांगितले. त्यानंतर विक्रम पवार याने गोविंद यांना विमानतळावर नोकरी लावण्यासाठी ३० हजार रुपये रोख मागितले. गोविंदला नोकरीची आवश्यकता असल्याने त्यांनी लगेच एटीएममधून १५ हजार रुपये काढून आरोपीला दिले. त्यानंतर काही दिवसांनी १५हजार रुपये आणून दिले. गोविंद यांच्यासोबतच दीपक हाटकर, भूषण हाटकर, शेख अश्फाक , विजय हाटकर, पूजा जाधव यांनाही नोकरीचे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळी एकूण ६३ हजार रुपये उकळले. तक्रारदारासह अन्य एकालाही आरोपीने नोकरी लावली नाही. ही बाब समोर आल्यानंतर गोविंदसह अन्य तक्रारदारांनी आरोपीला भेटून पैसे परत करण्याचे सांगितले. तेव्हा त्याने गोविंद यांना २९ हजारांचा धनादेश दिला. हा धनादेश खात्यात पैसे नसल्याने न वटता परत आला. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात येताच त्यांनी याविषयी आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अरुण वाघ यांनी अर्जाची चौकशी करून याप्रकरणी सातारा ठाण्यात शनिवारी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
विमानतळावर नोक रीच्या सहा बेरोजगारांना आमिषाने फसविणाऱ्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:06 PM