अमन शकील शेख (१८ रा.जोगेश्वरी) व त्याचा मित्र अनिकेत ज्ञानेश्वर शेजूळ हे शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, एफ.एफ. ००६२)वरून रांजणगावच्या दिशेने चालले होते. विटावा फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (क्रमांक एम.एच.१७, सी.ई.११४५) ने अमनच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अमन व अनिकेत गंभीर जखमी झाले. हा अपघात पाहताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना मदत करीत १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अमनच्या डोक्याला व उजव्या पायाला मार लागला असून, अनिकेतही गंभीर झाला आहे. याप्रकरणी अमनच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------
बजाज नगरात वृक्षारोपण सप्ताहाचा समारोप
वाळूज महानगर : सामाजिक विचारमंचतर्फे आयोजित वृक्षारोपण सप्ताहाचा रविवारी बजाज नगरात समारोप करण्यात आला.
सामाजिक विचारमंचच्यावतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी १८ जुलैपासून वृक्ष लागवड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात मंचच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून परिसरात मोकळे भूखंड व रस्त्याच्या कडेला विविध जातीची जवळपास २०० झाडे लावून या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. रविवारी या वृक्षारोपण सप्ताहाचा बजाज नगरातील नाना-नानी पार्क येथे समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पा. पेरे, जागतिक साळी फाउंडेशनचे वैभव ढोरजे, स्नेहा फाउंडेशनचे डॉ. राजेंद्र धनवई, उद्योजक शशिकांत ढमढेरे, रेखाताई हिंगणकर, सामाजिक विचार मंचचे संस्थापक गजाजन नांदूरकर, अध्यक्ष केशव ढोले, पोपटराव थोरात, पारसचंद साकला, जि. प. सदस्य रेखा नांदूरकर आदींची उपस्थिती होती. सविता औटी यांनी सूत्रसंचालन केले तर पोपटराव थोरात यांनी आभार मानले.
फोटो ओळ- बजाज नगरात सामाजिक विचार मंचतर्फे वृक्षलागवड सप्ताहाच्या समारोपप्रसंगी वृक्षारोपण करताना भास्कर पेरे, गजानन नांदूरकर, शशिकांत ढमढेरे आदी.