औरंगाबाद : बाल अत्याचाराच्या अश्लील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करणारे पाच जण औरंगाबादेतील असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. याविषयी वेगवेगळ्या ठाण्यांत पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, देशभरातील विविध प्रांतातून अल्पवयीन मुले हरवण्याच्या घटनांची पोलिसांत सतत नोंद होत असते. याविषयी अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलीस तपास करतात. मात्र, काही मुले सापडत नाहीत. अशा बालकांचा चाईल्ड पोर्नोग्राफी तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या अश्लील क्लीप फेसबुक, व्हॉटस्अप आदी सोशल मीडियावर व्हायरल क रण्यात आल्या आहेत.
यातील काही क्लीप औरंगाबादेतून व्हायरल करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ११ जानेवारी रोजी सातारा ठाणे, छावणी आणि सिडको ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. अधिक तपासामध्ये ३१ जानेवारी रोजी सायबर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशांत शेळके, प्रशांत साकला, गोकुळ कुत्तरवाडे, मन्सूर शहा, अमोल सोनटक्के यांच्या तक्रारीवरून जिन्सी, वाळूज, उस्मानपुरा, सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
यामुळे अल्पवयीन मुलांच्या अश्लील क्लीप तयार करणे, त्या प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. यामुळे अश्लील क्लीप जवळ बाळगू नये, त्यांचा प्रसार करू नये, असे आवाहन सायबर ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, सपोनि राहुल खटावकर, कर्मचारी मन्सूर शहा, ज्योती भोरे, शिल्पा तेलोरे यांनी केले आहे.