औरंगाबाद : चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीवरील बंद कारखान्यात गुरुवारी सकाळी झालेल्या रसायनाच्या स्फोटात ४६ वर्षीय महिला ठार झाली. या घटनेला मृत महिलेच्या पतीला जबाबदार धरून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र रुद्राके (४९, रा. नवपुते वस्ती, चिकलठाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नवपुते वस्ती येथे आरोपीचा कूलर आणि फायबर दरवाजे बनविण्याचा बंद कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच त्यांचे घर आहे. गुरुवारी सकाळी या बंद पडलेल्या कारखान्यात काही तरी काम करण्यासाठी ज्ञानेश्वर रुद्राके यांची पत्नी मीरा गेल्या होत्या. त्यावेळी तेथे चार वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या केमिकलच्या कॅनींचा अचानक स्फोट झाला. स्फोटात मीरा ठार झाल्या. प्राथमिक तपासणीत स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, बंद पडलेल्या कारखान्यात अत्यंत घातक केमिकल ठेवण्यात आले. या केमिकलची योग्य काळजी कारखान्याचे मालक ज्ञानेश्वर यांनी घेतली नाही. त्यामुळे हा स्फोट झाला आणि या घटनेत मीरा यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वरविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार मुरलीधर सांगळे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक एस. बी. केदारे तपास करीत आहेत. स्फोटाच्या केमिकलचा शोध सुरूफायबर कूलर आणि दरवाजे बनविण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल वापरण्यात येतात. बंद पडलेल्या या कारखान्यात चार वर्षांपासून केमिकलच्या काही रिकाम्या तर काही अर्धवट भरलेल्या कॅनी होत्या. यापैकी कोणत्या केमिकलचा स्फोट झाला, याबाबतचा तपास फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेचे तज्ज्ञ करीत आहेत.
रसायन स्फोटप्रकरणी मृत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा
By admin | Published: August 20, 2016 1:08 AM