छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी १० दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला दाखल करण्यात आले होते. या अर्भकावर उपचार सुरू असतानाच मातेने बाळाला सोडून पलायन केले. या मातेच्या विरोधात सहा महिन्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी बाळाचा परित्याग केल्याचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
सामाजिक संस्था साकारचे विजय राजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेने १८ जून २०२२ रोजी घाटी रुग्णालयातील आयसीयूमध्ये एका दहा दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला उपचारासाठी दाखल केले होते. बाळावर उपचार सुरू असतानाच त्याच्या मातेने घाटीतून पलायन केले. डॉक्टरांसह इतरांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, कोठेही माता आढळून आली नाही. याविषयीची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली होती. सहा महिन्यांपर्यंत पोलिसांनी बाळाच्या मातेचा शोध घेतला, मात्र ती काही सापडलीच नाही. त्यामुळे बाळाची देखभाल करण्याची जबाबदारी असताना देखील त्या बाळाचा परित्याग करण्याच्या उद्देशाने माता निघून गेली. त्यामुळे राजाळे यांच्या तक्रारीवरून मातेविरोधात गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक फाैजदार गोमटे करीत आहेत.
बाळ संस्थेकडे सुखरूपदहा दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्यानंतर एका सामाजिक संस्थेने बाळाचा व्यवस्थित सांभाळ केला आहे. त्या संस्थेकडे बाळ सुखरूप असल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.