औरंगाबाद : पोलीस हवालदार असलेल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता दुसऱ्या तरुणीसोबत परस्पर विवाह करणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह त्याचे लग्न लावून देणाऱ्या सासरच्या लोकांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस हवालदार दीपक शेनफड भाले, त्याचे वडील शेनफड भाले, भाऊ अनिल भाले, मेहुणा नितीन जगधने आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला आणि आरोपी ग्रामीण पोलीस दलात हवालदार आहेत. किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्यावर आरोपी तिला दीपकचे दुसरे लग्न लावून देण्याची भाषा वापरत आणि त्याच्या पाठिंब्यावर आरोपी दीपकने १९ वर्षीय तरुणीसोबत दुसरा विवाह केला. ही बाब समजताच भाले यांच्या पहिल्या पत्नीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.
उपायुक्तांनी घेतली तातडीने दखल तक्रारदार महिला हवालदारांनी पतीविरूद्ध तक्रार अर्ज पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. शनिवारी तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी त्यांच्या अर्जाची दखल घेत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.