औरंगाबाद : सातारा, देवळाई परिसरातील अंतर्गत रस्ते कामाची निविदा मागे घेण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत कोकणवाडी चौकात शनिवारी झालेल्या हाणामारीप्रकरणी रविवारी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८ आणि १४९ कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आमदार व उपमहापौरांवर मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.
वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, सातारा, देवळाईतील अंतर्गत रस्ते कामाच्या कंत्राटावरून आ. संजय शिरसाट आणि पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यातून शनिवारी दुपारी कोकणवाडी येथे आमदारांच्या कार्यालयासमोर दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या खेडकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, तर शिरसाट यांच्या जखमी समर्थकांनी घाटीत जाऊन उपचार घेतले. दरम्यान, याप्रकरणी खेडकर यांनी रविवारी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आ. शिरसाट यांनी बोलावल्यामुळे शनिवारी दुपारी त्यांच्या कार्यालयासमोर गेलो असता, आ. शिरसाट यांनी सातारा, देवळाईतील टेंडर मागे घेण्यास सांगितले. मी त्यांना नकार दिल्याने त्यांनी आपल्या गालावर चापट मारली आणि शिवीगाळ केली. त्याचवेळी तेथे असलेल्या उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कॉलर पकडून ओढून मानेवर चापट मारली. राजू राजपूत यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तर अनिल बरारे यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. नीलेश नरवडे यांनीही मारहाण केली. यावेळी अनुप मुंदडा आणि दिलीप हेकडे हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद केले.
या तक्रारीवरून पोलिसांनी आ. शिरसाट, उपमहापौर जंजाळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात भादंवि ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८ आणि १४९ कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे तपास करीत आहेत. तर आ. शिरसाट समर्थक अनिल बिरारे यांनी रात्री आरोपी सुशील खेडकर, अनुप मुंदडा, दिलीप हेकडे यांच्यासह अन्य काही लोकांनी कार्यालयासमोर येऊन आमचा रस्ता अडविला आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत सुशील खेडकर व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.