औरंगाबाद : सहकारी महिला लिपिकाचे सेवापट गहाळ करणाऱ्या जलसंपदा विभागातील दोन कारकूनांविरुद्ध शुक्रवारी रात्री जवाहरनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. एम. एस. कोळी आणि के. एस. सुरडकर अशी आरोपी कारकूनांची नावे आहेत.
जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आरोपी सध्या वैजापूर येथील जलंधारण उपविभागीय कार्यालयात कार्यरत आहे. कडा कार्यालयातील यांत्रिकी विभागात ते दोन वर्षापूर्वी कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे आस्थापना विभागाचे काम होते. शासनाने सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापटाचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने महिला लिपिकाने मार्च २०१८ मध्ये कडा कार्यालयात कार्यरत असलेल्या आरोपींकडे त्यांचे सेवापट दिले.
हे सेवापट देताना त्यांना ते दिल्याची अधिकृत नोंद आवक जावक रजिस्टरला करण्यात आली होती. शिवाय त्यांनी सेवापट प्राप्त झाल्याची पोच पावती आरोपींकडून घेतली होती. असे असताना आरोपी कारकून यांनी सेवापट गहाळ केला. यामुळे त्यांना बढती आणि अन्य वेतनवाढ मिळू शकली नाही. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर कार्यालयाने अंतर्गत चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीने दोन्ही आरोपींवर ठपका ठेवण्यात आला होता.