वाळूज महानगर : दोन वर्षांपूर्वी बांधकाम ठेकेदाराला चॅप्टर केस न करण्यासाठी व लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू आसाराम बडवणे (रा. गारखेडा परिसर) हे बांधकाम ठेकेदार असून, त्यांनी दोन वर्षांपूर्वी रांजणगाव शेणपुंजी येथे भगवान कदम यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतला होता. मात्र, पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याने घरमालक कदम यांनी ठेकेदार बडवणे यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर ३ मार्च २०१९ रोजी पोना. अशोक कांबळे यांनी बडवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. कांबळे यांनी बडवणे यांना चॅप्टर केस न करण्यासाठी, तसेच लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. बडवणे पैसे देण्यास नकार देत घरी निघून गेले. नंतर पोकॉ. रामदास कावटवार यांनी बडवणे यांची भेट घेऊन ५ हजार मागितले. याप्रकरणी बडवणे यांनी एसीबीच्या कार्यालयात या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा लाच प्रकरणाचा अहवाल सादर केल्यानंतर एलसीबीचे निरीक्षक गणेश धोकट यांनी ठेकेदार बडवणे यांना बोलावून या दोघा लोकसेवकांविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले होते. बडवणे यांनी सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोना. अशोक कांबळे, पोकॉ. रामदास कावटवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------