औरंगाबाद: शहरातील केवळ बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चो-या करणा-या ‘खिडकी गँग’ला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री पकडण्यात यश आले. वाळुज रोडवर आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. या चोरट्यांनी शहरात सात ते आठ बंगल्यात घरफोड्या केल्याची कबुली दिली. सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३५,रा. महंमदिया कॉलनी,बीड), सय्यद सिराज सय्यद लियाकत(३२,रा.पुरग्रस्त कॉलनी,बीड, ह.मु.वडगाव गुप्ता, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान(३१,रा.नागापूर एमआयडीसी, दांगटमळा, अहमदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, शहरातील सिडको एन-३,एन-४, व्यंकटेशननगर, सिडको एन-१ आदी वसाहतीमधील बंगल्यांच्या खिडक्या तोडून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचा चोरून नेण्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हेशाखेचे पोलीस तपास करीत असताना घरफोड्या करणारी टोळी कारने वाळुज रोडने शहरात येत असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकाँ शिवाजी झिने, विलास वाघ, राजेंद्र साळुंके, रवी दाभाडे,विशाल सोनवणे, देवचंद महेर, गजानन मांटे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, चालक थोरे यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाळुज रोडवर सापळा रचला. यावेळी संशयित कार दिसताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र कारचालक न थांबता पुढे निघाला.यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तब्बल आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून कारसमोर पोलिसांची जीप आडवी लावून त्यांना पकडले. पोलिसांनी फिल्मस्टाईल त्यांच्यावर धावा बोलताच आरोपींना प्रतिकार करता आला नाही. यावेळी त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याजवळ स्क्रु-ड्रायवर, लहान टॉमी, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज मिळाला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचे समोर आले.
घरफोड्या करणा-या ‘खिडकी गँग’च्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 6:15 PM