भीमराव दिलीप घुसळे (३२ वर्षे, रा. क्रांतीनगर ) असे मयताचे नाव आहे, तर ललित विजय जाधव (रा. क्रांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, आरोपी ललित हा २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जय टॉवर इमारतीच्या तळ मजल्यामागील मोकळ्या जागेत दारू पित बसला होता. त्यावेळी घुसळे तेथे आला आणि दारू पिण्यासाठी त्याने ललितकडे पैसे मागितले. ललितने त्याला पैसे नसल्याचे सांगितले. हवी असेल तर त्याच्याजवळील थोडी दारू देतो असे तो म्हणाला. याचा राग आल्याने घुसळेने ललितला शिवीगाळ करीत कानाखाली मारली. यामुळे ललितने त्याला जोराचा धक्का दिल्याने भिंतीला डोके आदळल्यामुळे खाली पडून तो जखमी झाला. यानंतर ललित तेथून घरी निघून गेला. काहीवेळाने रात्री तो कोकणवाडी चौकात गेला तेव्हा तेथे त्याला लोकांची गर्दी दिसली. एक जण मरून पडल्याचे ऐकून तो तेथे गेला असता घुसळे मृतावस्थेत त्याला दिसला. या घटनेची माहिती त्याने वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन दिली. पोलिसांनी घुसळेला घाटीत दाखल केले. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल भगवान कंकाळ यांनी सरकारतर्फे आरोपी ललित जाधवविरुद्ध मंगळवारी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकत्ते तपास करीत आहेत.
तरुणाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:05 AM