वाळूज महानगर: लुटमार प्रकरणातील जेरबंद केलेला सराईत गुन्हेगार गणेश अण्णासाहेब बन्सोडे याने शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली. त्याची चौकशी सुरु असताना त्याने फौजदाराला चकमा देत पसार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील गणेश अण्णासाहेब बन्सोडे (२७) हा सराईत गुन्हेगार आहे. गणेश हा गावात अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करतो. तसेच तो पोलीस असल्याचे भासवून नागरिकांना लुटत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.त्याच्यावर वाळूज पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांत लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी लुटमार प्रकरणात रेखाचित्रावरुन वाळूज पोलिसांनी नांदलगाव येथून गणेश बन्सोडे याल शिताफीने जेरबंद केले होते.
ताब्यात घेतल्यानंतर वाळूज पोलीस ठाण्यात लॉकअपची सुविधा नसल्यामुळे त्याला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ठेवले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गणेश याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्याला वाळूज पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. गणेश बन्सोडे याला ताब्यात घेतल्यानंतर दुपारी फौजदार रामचंद्र पवार हे त्याची कसून चौकशी करीत होते. दरम्यान, गणेशने फौजदार पवार यांना चकमा देत पोलीस ठाण्यातून सिने स्टाईल पलायन केले. काही काही क्षणात हा प्रकार घडल्यामुळे वाळूज पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची नजर चुकवत तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
आरोपी गणेश बन्सोडे याने शुक्रवारी वाळूज पोलिस ठाण्याच्या पाठीमागील भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले. त्याच्या शोधार्थ वाळूज पोलीस ठाण्याचे ६ तर गुन्हे शाखेचे ३ पथक विविध ठिकाणी रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.