वाळूज महानगर : वाळूज येथे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत मंगळवार सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुभम अशोक शेळके (२४ रा. अविनाश कॉलनी,वाळूज) असे मृताचे नाव असून, त्याच्याविरुध्द विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुभमने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला, या विषयी गूढ कायम आहेत.
वाळूज येथील ग्रामपंचायतीची विहीर असून, या विहिरीवरुन शिवाजीनगरला पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा कर्मचारी पांडुरंग आगळे मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पंप सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना तरुणाचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला. त्यांनी सरपंच पपीन माने व वाळूज पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक रवीकुमार पवार, पोहेकॉ.कासरले, व्ही.एस.खंडागळे, पोकॉ.प्रदीप बोरुडे, सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ताजु मुल्ला आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी काहीच्या मदतीने तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृत तरुण हा अविनाश कॉलनीचा रहिवासी असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. अशोक शेळके यांनी मृत तरुण शुभम (१७) हा आपला मुलगा असल्याचे सांगितले. ओळख पटल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
शुभमविरुद्ध विविध गुन्हेशुभम हा गुंडप्रवृत्तीचा असून, कुटुंबासोबतही त्याचे वारंवार खटके उडत असल्याचे समजते. विशेष म्हणजे शुभम व त्याच्या साथीदाराविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शुभम व त्याच्या एका साथीदारास लिंबेजळगावला अटक करुन त्यास वैजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. तसेच शुभमविरुद्ध मुलीच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल आहे.