औरंगाबाद : खडकेश्वर येथील मृणाल पॅलेस या लॉजमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री धाड टाकली. या कारवाई सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख २९ हजाराची रोकड, महागडे मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचे साहित्या असा सुमारे ५लाख २७ हजार ५५०रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईने हॉटेल्स आणि लॉजमधील खोली भाड्याने घेऊन जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
प्रवीण भारत जैस्वाल(वय ४०,रा.नागेश्वरवाडी),शहजाद शमशोद्दीन खान (४२,रा. जहाँगिर कॉलनी, हर्सूल परिसर), पंडित शाम काळे (वय ५७,रा.जवाहर कॉलनी), शेख नबी शेख बशीर (वय ४८,रा. मुकुंदवाडी), तौफिक इब्राहिम कुरेशी( ४०,रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी), कृष्णा पाडुरंग दळवी(वय ४०,रा. गारखेडा परिसर), संजय रामभाऊ शिंदे (वय ४२,रा. श्रद्धा कॉलनी,म्हाडा) अशी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, खडकेश्वर येथील मृणाल पॅलेस या लॉजमधील एका रूममध्ये काही लोक झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री खबऱ्याकडून गुन्हेशाखेला मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार देवरे, कर्मचारी नितीन मोरे, भगवान शिलोटे, विलास वाघ, संजय खोसरे, विशाल पाटील यांनी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मृणाल लॉजमधील संशयित खोलीवर धाड टाकली तेव्हा सात जण गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी पोलिसांनी दोन पंचासमक्ष तंची झडती घेतली तेव्हा सर्वांकडे महागडे सात मोबाईल फोन, दोन मोटारसायकली, जुगाराचे साहित्य आणि सव्वा लाखाची रोकड जप्त केली.