औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवून खुलेआम दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्या ८ व्यापाऱ्यांविरुद्ध विविध ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले. शरीफ कॉलनी येथे हॉटेल उघडणाऱ्या दोन जणांवर १२ एप्रिल रोजी पोलिसांनी कारवाई केली. अबू सोहेलखान अब्दुल फईज खान (रा. रहेमानिया कॉलनी) आणि मोहम्मद रजेब अली (रा. बायजीपुरा), अशी हॉटेलचालकांची नावे आहेत. पोलीस हवालदार रामकृष्ण आरदवाड यांनी ही कारवाई केली.
अन्य एका घटनेत टाउन हॉल येथे लै भारी नावाची पानटपरी उघडून व्यवसाय करणाऱ्या अमोल दीपक जोगदंडे (रा. टाउन हॉल) यांच्याविरुद्ध गस्तीवरील गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल सुरे यांनी कारवाई केली. अमोल यांची पानटपरी रात्री १० वाजता उघडी दिसल्याचे आणि तेथे विनामास्क ग्राहक उभे असल्याचे पाहून पोलिसांनी कारवाई केली.
तिसऱ्या घटनेत कुंभारवाडा येथे विना मास्क हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या चार जणांवर सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. हवालदार अरुण चाफेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख फेरोज शेख गफूर, यासिन मोहम्मद करीम, मोहम्मद शोएब मोहम्मद याकूब आणि हनिफ खान इस्माईल खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
जटवाडा रस्त्यावरील राधिका टी हाउस हे दुकान उघडून ग्राहकांना चहा विक्री करताना पोलिसांनी हॉटेलचालक अमोल अशोक जाधव यांना पकडले. आरोपी अमोल विनामास्क दुकानदारी करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. हवालदार पंढरीनाथ जायभाये यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
=================