औरंगाबाद: पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर रेल्वस्टेशन परिसरातील लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून तिचे दोन लाख रुपये घेऊन त्याने फसवणूकही केल्याचे समोर आले.
शेख जुबेर शेख अब्दुल अजीज (रा. बीडपाय परिसर)असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला तिच्या दोन मुलासह बायजीपुरा भागात पतीपासून विभक्त राहाते. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करून तिचा उदरनिर्वाह करीत असते. आरोपी जुबेरसोबत तिची जूनी ओळख असल्याने त्याचे तिच्याघरी येणे-जाणे असायचे. या कालावधीत त्याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याचे तिला सांगितले. या व्यवसायात मोठा नफा असल्याने तुझ्याकडील पैसे गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुला दुप्पट पैसे देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने त्याला दोन लाख रुपये दिले. यानंतर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.
एप्रिल महिन्यात आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या व्यवहाराचा हिशेब करायचे असल्याचे सांगितले आणि रेल्वेस्टेशन येथे बोलावले. पीडिता दुचाकीने तेथे गेल्यानंतर आरोपीने तिला थंड पाणी पिण्यास दिले. यामुळे तिचे डोकं दुखायला लागल्याचे तिने त्यास सांगितले. तेव्हा त्याच्या ओळखीची रेल्वेस्टेशन येथील लॉजवर आराम कर, असे सांगून तो तिला तेथे घेऊन गेला. लॉजवरील एका खोलीत नेल्यानंतर त्याने गुंगीचे औषध टाकलेले ज्यूस तिला पिण्यास दिले. पीडितेने ज्यूस पिल्यानंतर ती अर्धवट बेशुद्ध झाली. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता शुद्धीवर आली तेव्हा तिला हा प्रकार लक्षात आला. यामुळे पीडितेने त्याच्याकडे याविषयी जाब विचारला असता त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे आणि तो तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने याविषयी तक्रार केली नाही.
यानंतर तो तिला वारंवार लॉजवर घेऊन जात आणि तिच्यावर अत्याचार करीत होता. दोन महिन्यापासून त्याने तिच्यासोबतचे संबंध अचानक तोडले आणि त्याचा मोबाईल बंद केला. आरोपीने विश्वासघात करून आपले लैगिंक शोषण केल्याची आणि दोन लाखाची फसवणूक केल्याची तक्रार तिने वेदांतनगर ठाण्यात नोंदविली. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे तपास करीत आहेत.