वाळूज महानगर : दीड महिन्यापूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत सिमेंटचे पत्रे बदलताना खाली पडून मरण पावलेल्या कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनी मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर शिवकुमार पासवान (रा. जोगेश्वरी) हा १७ मे रोजी सकाळी त्याचे मित्र तरबेज, अलीम, खिल्लारे यांच्यासोबत वाळूज एमआयडीसीतील बालाजी पॅकेजिंक या कंपनीत सिमेंटचे खराब झालेले पत्रे काढण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम संपल्यानंतर ठेकेदार युनुस शेख याने सागर व त्याच्यासोबत असलेल्या इतर कामगारांना तुम्ही काम करीत असलेल्या बाजूच्या पत्र्यातून पाण्याची गळती होत असून, ते काम करून घरी जा, असे सांगितले. सायंकाळ झाल्याने कामगारांनी उद्या काम करतो, असे ठेकेदार युनुस शेख याला सांगितले. मात्र, ठेकेदाराने या चौघांना बळजबरीने काम करण्यास भाग पाडले. काम संपल्यानंतर कंपनीच्या छतावरून जात असताना खराब झालेल्या सिमेंटचा पत्रा तुटून सागर हा जवळपास २५ ते ३० फूट उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. सागरला इतर कामगारांनी बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. कंपनीत काम करण्यापूर्वी कंपनी मालक चांडक व ठेकेदार शेख युनुस यांनी कामगारांना सुरक्षा साधने व सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न केल्याने सागर पासवान याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पासवान याची आई गीता पासवान यांच्या तक्रारीवरून कंपनी मालक चांडक व ठेकेदार शेख या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत.