छत्रपती संभाजीनगर : आक्षेपार्ह इशारे, स्पर्श करुन भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमृता जाधव निकिता (३८, रा. बाळापुर), सोफिया शेख आलिया शेख (२५), काव्या शेख आलिया शेख (२५, रा. शिवाजीनगर), संगिता शेख निकिता (२३, रा. काबरानगर) असे आरोपींचे नावे असून जिन्सी पाेलिसांनी ही कारवाई केली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रत्येक चौक, सिग्नलवर तृतीयपंथीयांनी हैदोस माजवला आहे. नागरिकांना पैसे मागणे, आक्षेपार्ह इशारे करुन पैशांसाठी बळजबरी करण्याचे प्रकारही घडत आहेत. नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याप्रकरणी वारंवार नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात होती. पोलिस उपायुक्त नवनित काँवत यांची याची दखल घेत जिन्सी पोलिसांना कारवाईच्या सुचना केल्या. सोमवारी सायंकाळी निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी पथकासह सेव्हनहील उड्डानपूल परिसरात गस्त घातली. यात चारही आरोपी नागरिकांना भिक मागताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम ४ मुंबई भिक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत १९५९ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सातत्याने कारवाई सुरू राहणारभीक मागणे कायद्याने गुन्हा आहे. त्यात कोणीही आक्षेपार्ह हरकती, स्पर्शकरुन जवळ जाऊन भिक देण्यासाठी बळजबरी करत असल्यास ती गंभीर बाब आहे. नागरिकांनी याबाबत तक्रारीसाठी समोर यावे. तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. शिवाय, पोलिसांकडून देखील प्रत्येक चौकात गस्त घालून लक्ष दिले जाईल. - नवनित काँवत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २.