वाळूज महानगर (औरंगाबाद ) : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या खाजगी गटनंबरमध्ये अनधिकृतपणे रेखांकन, बांधकाम करून भूखंड व घरांची विक्री करणाऱ्यांवर सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सूचना देऊनही अनधिकृत रेखांकन व बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकांविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरूकेली आहे.
वाळूज महानगर परिसरात सिडको अधिसूचित येणाऱ्या वडगाव कोल्हाटी, शरणापूर, साजापूर आदी ठिकाणी सिडकोची परवानगी न घेता अनेकांनी खाजगी जमिनीवर प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जणांनी लेआऊट मंजूर करून घेत रेखांकन केले आहे, तसेच घरे बांधली आहेत. हा प्रकार लक्षात येताच सिडको प्रशासनाने २००७ पासून संबंधित प्लॉट व घराच्या नोंदी घेऊ नयेत म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा निबंधक यांना पत्रव्यवहार केला आहे.
तरीही सर्रास बिल्डरांकडून प्लॉट व घरांची खरेदी-विक्री केली जात असून, स्थानिक ग्रामपंचायतीला नोंदीही घेतल्या जात आहेत. या अनधिकृत नागरी वसाहतीत ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, रस्ते, पथदिवे आदी नागरी सुविधा कोण पुरविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या गटनंबरमध्ये अनधिकृत प्लॉटिंग..सिडको व पंचायत समितीच्या पथकाने संयुक्त पाहणी केली. त्यात वडगाव कोल्हाटी हद्दीतील गटनंबर, ५, ६, ७, ९, १०, १०/१, १०/२, ११, १२ मधील हनुमाननगर, विश्व टी, माऊलीनगर, छत्रपती प्लॉटिंग, स्वास्तिक डेव्हलपर्स, श्रीराम प्लॉटिंग, एकदंत रेसिडन्सी व शरणापूर ग्रा.पं. हद्दीतील शेकापूर उडाणमधील गटनंबर ५ आणि ६ मध्ये अनधिकृत रेखांकन व बांधकाम सुरू असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने संबंधित नागरिकांना रेखांकन आणि बांधकामास मनाई केली आहे.
सिडको अधिसूचित क्षेत्रातील अनधिकृत प्लॉटिंग व बांधकाम करणाऱ्यांवर सिडको प्रशासनाने यापूर्वीही पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, गुन्हेही दाखल केले आहेत. सूचना देऊनही रेखांकन व बांधकाम थांबविले गेले नाही, तर संबंधित बांधकामधारकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सिडकोचे अतिक्रमण हटाव पथक प्रमुख गजानन साटोटे यांनी दिली.