औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.एम.पी. लॉ महाविद्यालयाने घेतलेल्या सराव परीक्षेत आणि विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतील प्रश्नांमध्ये मोठ्या प्रमाणात साधर्म्य होते. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वच विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यासाठी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे परीक्षा संचालक, प्रकुलगुरूंना निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचे कारण दिल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण करीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारतीच्या बाहेर काढले. यानंतर दुसºया दिवशी विद्यापीठ प्रशासनाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते, अजहर पटेल आदींवर १४३, ५०६ कलामांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कुलगुरूंना विद्यार्थ्यांना भेटण्यास वेळ नाही. मात्र, त्याचवेळी अधिकारी, विशिष्ट व्यवस्थापन सदस्यांसोबत तासन्तास बसण्यासाठी वेळ मिळतो. हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा प्रकार असल्याचे नवनाथ देवकते यांनी सांगितले.चौकट,दुष्काळग्रस्ताच्या शुल्कमाफीच्या घोटाळ्यामुळे कारवाईशैक्षणिक वर्ष २०१४-१५ आणि १५-१६ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शासनाने शुल्कमाफीपोटी दिलेले ७ कोटी ७० लाख रुपये महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाने हडप केले आहेत. या प्रकरणाचा भंडाफोड मराठवाडा लॉ कृती समितीने केला होता. याशिवाय बोगस प्रवेश प्रकरण, पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांना आकरण्यात येणारे अतिरिक्त शुल्क परत करणे, अशा विविध प्रकरणांत लढा दिल्यामुळे २० ते २५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने बदला घेतला असल्याचा अरोप नवनाथ देवकते यांनी केला आहे.
कुलगुरूंची भेट मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:23 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.
ठळक मुद्देविद्यापीठ : साडेसात कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळेच कारवाई; विद्यार्थ्यांचा आरोप