चिंचोली लिंबाजीसह परिसरातील नेवपूर, वाकी, बालखेड, रेउळगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी, लोहगाव परिसरात ९ जून रोजी जोरदार पाऊस झाला होता. सलग दोन दिवस धो-धो बरसल्याने चिंचोली महसूल मंडळात ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
कृषी विभागाकडून १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणीला सुरुवात केली होती. मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस दमदार झाल्याने परिसरातील जवळपास ६०-७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशी, मका, अद्रक या पिकांची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर गत सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत. पेरणी केल्यानंतर त्यावर एकही पावसाची सर झाल्याने पिकांची पूर्णक्षमतेने उगवण झालेली नाही. जे अंकुर जमिनीतून बाहेर आले तेही सुकू लागले आहेत.