औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्यावाढीचा स्फोट होत असून, उपलब्ध आरोग्य सुविधा तोकडी पडू लागली आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना खाटा अडवून ठेवल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने चार सदस्य समिती सर्व रुग्णालयातील रुग्णांचा आढावा घेणार आहे. सौम्य लक्षणांच्या रुग्णांनी गंभीर रुग्णांच्या खाटा अडविल्या असतील तर संबंधित खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी बैठकीत दिला.
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालये तसेच इतर उपचार सुविधांमध्ये दाखल रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार (रुग्ण दाखल करण्याच्या एसओपीप्रमाणे) झालेली आहे का? याची शहानिशा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस विभाग, मनपा, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश असलेले तपासणी पथक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. या पथकामार्फत केलेल्या तपासणीत ज्या रुग्णालयांनी सौम्य स्वरूपाची किंवा लक्षणे नसलेले सीसीसीमध्ये दाखल होऊ शकणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटा अडविलेल्या आहेत, अशा रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश चव्हाण यांनी दिले.
मनपाकडून किट पुरविणारवाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट महानगरपालिकेकडुन मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध मनुष्यबळ आणि उपचार सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याच्या सूचना मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी संबंधितांना बैठकीत दिल्या.
हॉस्पिटलनिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकसर्व खासगी रुग्णालये, इतर उपचार सुविधा केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार झाली आहे का ? याची शहानिशा करण्यासाठी हॉस्पिटलनिहाय नोडल उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत आरोग्य, पोलीस, महसूल अधिकारी असतील. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, रुग्णालयात खाटा अडवून बसलेले आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय झाला आहे.