राजेश खराडे ,बीडशेतकऱ्यांकरिता बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच कृषी कार्यालयातील शेत परिसरातून शेतकऱ्यांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन व्हावे याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या सुमारे २० एकरावर पिकांची लागवड करण्यात आली होती; मात्र पावसाअभावी यंदाच्या रबी व खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवावे याकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालयातील शेतजमिनीवर वेगवेगळे प्रयोग केले जात असत. यातूनच येथे मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस घटते उत्पादन व सर्कलच्या ठिकाणीच मार्गदर्शन केंद्र उभारल्याने येथील केंद्रमाला उतरती कळा लागली आहे.सद्य:स्थितीला शेतजमिनीवर पिकांची लागवड व लगतच रोपवाटिका उभारली आहे. येथील उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले बी-बियाणे मिळून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. उर्वरित उत्पादन हे महाबीज कंपनीकडे विक्री केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून सबंध जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच संबंधित अधिकाऱ्यांकडून या जमिनीवर प्रयोग राबविण्याबाबत उदासीनता असल्याने यंदा खरीपाच्या हंगामात एकही पीक पदरी पडले नाही. शिवाय रबी हंगामात ज्वारी पाच एकरात, करडई साडेसात एकरात, तर चारापीक म्हणून मक्याची लागवड पाच एकरात करण्यात आली होती. येथील उत्पादनावर वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्शवत उदाहरण ठेवणे अपेक्षित होते; मात्र लागवडीपासूनच सबंध पिके धोक्यात होती. ज्वारीची तर वाढ खुंटल्याने बाटुकाअवस्थेतच काढणीला सुरुवात झाली होती. मका आणि करडईमधून अपेक्षित असे उत्पादन हाती लागले नाही. उलटअर्थी, उत्पादनापेक्षा अधिक खर्च कामगारावर झाला आहे.
कृषी कार्यालयाचेही पीक नियोजन ‘फेल’
By admin | Published: January 30, 2016 12:02 AM