सोयगाव : बोंडअळीचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून सोयगाव तालुक्यात ८६ गावांमध्ये कीड रोग सर्वेक्षण आणि नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी कपाशी पिकाच्या झाडांवर थेट कृषी विभाग नियंत्रण ठेवणार असून, प्रतिबंधात्मक उपाय योजनाही शेतकऱ्यांना सांगण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.
कीडरोग सर्वेक्षण आणि नियंत्रण मोहिमेत फर्दापूर ते मोहळाई कपाशीचे प्रत्येकी चार प्लॉट आणि मक्याचे दोन प्लॉट याप्रमाणे सहा प्लॉट निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये १८ कृषी सहायक आणि ३ कृषी पर्यवेक्षक या प्लॉटचे निरीक्षण आणि सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. जामठी ते सावळदबारा यासाठी कपाशी पिकाचे चार आणि सोयाबीन पिकाचे प्रत्येकी दोन प्लॉट निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून, यामध्ये कामगंध सापळे वापरून या पिकांचे कीडरोग सर्वेक्षण केले जाणार आहे. सोयगाव तालुक्यात ३० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बदलते वातावरण आणि ढगाळ वातावरणाच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ३० हजार हेक्टरपैकी तब्बल ११,५३२ हेक्टरवरील कपाशीची पिके सध्या फुलपात्यावर आलेली आहेत. त्यावर बोंडअळीचा अटॅक होऊ नये, यासाठी हे सर्वेक्षण होणार आहे.
मका आणि सोयाबीनचेही सर्वेक्षण
मका पिकांवर लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फर्दापूर कृषी मंडळात मका पिकांवर नियंत्रण आणि सर्वेक्षणासाठी कृषी विभाग सतर्क झालेला असून, सोयाबीनवर नव्याने सर्वेक्षणाचा प्रयोग यंदाच्या खरिपात कृषी विभागाने हाती घेतला आहे.
चार गावांमध्ये विशेष सर्वेक्षण
बनोटी मंडळातील पहुरी, निमखेडी आणि फर्दापूर मंडळातील कंकराळा, डाभा या चार गावांची पीक तसेच कीडरोग सर्वेक्षणासाठी विशेष निवड करण्यात आली आहे. यात चारशे कामगंध सापळे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार असून, हेक्टरी २० सापळे लावण्यात येणार आहेत.
छायाचित्रओळ : सोयगाव परिसरात फुलपात्यावर आलेल्या कपाशी.
220721\img_20210722_164941.jpg~220721\img_20210722_164914.jpg~220721\img_20210722_164919.jpg
सोयगाव तालुक्यात फुलावर आलेला कापशीचा हंगाम~सोयगाव तालुक्यात केशरी फुलांच्या कपाशी पिके~सोयगाव-कपाशीचे सदृढ बहरलेला हंगाम