छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी खरीप पिके वाळू लागल्यामुळे नांदूर-मधमेश्वर कालव्यात तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी करीत गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयासमोर निदर्शने केली.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी जिल्ह्यात आतापर्यंत मुसळधार पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मागील २० दिवसांपासून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात पावसाचा थेंब न पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. कमी पावसाचे तालुके असलेल्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील एक लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली यावी, यासाठी नांदूर, मधमेश्वर प्रकल्प बांधण्यात आला. या प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भवली आणि वाकी ही धरणे बांधण्यात आलेली आहे.
चांगला पाऊस झाल्याने या चारही धरणामध्ये आज ८५ ते ९० टक्के जलसाठा आहे. यामुळे या धरणातून नांदूर, मधमेश्वर कालव्यात तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी कडा कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्याकडे १५ दिवसांपूर्वी केली होती. मात्र निर्णय न झाल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकरी आज कडा कार्यालयावर धडकले होते. अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. पाणी सोडण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे आश्वासन दिले.
२० दिवस लागते शेतकऱ्याच्या शेतात पाणी यायलानांदूर, मधमेश्वर प्रकल्पात पाणी सोडल्यानंतर या प्रकल्पातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचण्यास २० दिवस लागतात. यामुळे आजच पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णयएखाद्या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी द्यायचे असेल तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो. कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी होत आहे. नांदूर, मधमेश्वर कालवा पाणीवाटप संस्थांचे पदाधिकारी गुरुवारी आले होते. यामुळे आजच पालकमंत्री संदीपान भुमरे यांना फोन करून ही बाब सांगितल्यानंतर शुक्रवारी ते याविषयी चर्चा करणार आहेत.- एस.के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.