संजय जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत नसल्याचे कारण पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे. दुसरीकडे लाखो हेक्टरमधील शेतकरी जायकवाडीतून पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत. पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील १,८३,३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. जायकवाडी धरणात जलसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकासाठी एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते; परंतु दुसरीकडे पाणी न मिळाल्यास लाभक्षेत्रातील लाखो एकरमधील खरिपाची पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मुळा, भंडारदरा व दारणा धरणांतून कालव्याद्वारे सिंचनासाठी आवर्तन देण्यात आल्याने तेथील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मात्र मोठी नाराजी आहे. पाणी न मिळाल्यास त्याचा फटका जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या १ लाख ८३ हजार हेक्टरमधील खरिपाच्या पिकास बसण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसावर लाभक्षेत्रातील लाखो हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; पण गेल्या २० दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने बाळसे धरलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची तगमग वाढीस लागली असून, शेतातील पिकासाठी धरणातून पाणी सोडा, अशी मागणी ते करीत आहेत.जायकवाडीच्या २०८ कि.मी. लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १,४१,६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यात औरंगाबाद- ७,६२० हे., जालना- ३६,५८० हे., परभणी- ९७,४४० हेक्टर क्षेत्र येते. या क्षेत्रात पेरणी झालेली असून, पाण्याअभावी पिके संकटात आहेत.
जायकवाडी लाभक्षेत्रातील पिके ‘सलाइन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 12:38 AM