लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात सलग सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतजमिनीत पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. मराठवाड्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात मांजरा व तेरणा नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, चार दिवसांत पुराच्या पाण्याने तिघांचा बळी घेतला आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढ्यांना पूर आला असून, पालम-गंगाखेड, गंगाखेड-परभणी, ताडकळस-पालम इ. प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१, तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले व वाघूर धरणाचेही दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.