‘सुपर स्पेशालिटी’त उपचाराची कसरत
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत सध्या ४५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कंत्राटी कर्मचारी कमी करण्यात आले आहे. परिणामी, अपुऱ्या मनुष्यबळावर उपचाराची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण मेडिसीन विभागात हलविण्याच्या घाटी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. या प्रक्रियेला गती देण्याची अपेक्षा डाॅक्टरांकडून व्यक्त होत आहे.
विमानतळावर रिक्षा थांबा देण्याची मागणी
औरंगाबाद : विमानतळावर रिक्षा थांबा देण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने खा. इम्तियाज जलील आणि खा. भागवत कराड यांच्याकडे केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी दिली. गेल्या ३ महिन्यांपासून ही मागणी प्रशासनाकडे केली जात आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत वाढ
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीचशेपर्यंत गेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयामुळे घाटीवरील रुग्णसेवेचा भार कमी होण्यास काही प्रमाणात हातभार लागत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या
इमारतीसाठी निधी
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील इमारतीच्या बांधकामासाठी नुकताच जवळपास दीड कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इमारतीच्या बांधकामावर परिणाम झाला होता; परंतु सध्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.