औरंगाबाद : महापालिकेत सुमारे १२५ कं त्राटी संगणक आॅपरेटर्सचे मागील ८ ते १० वर्षांतील पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरणा केली नसल्याचा आरोप गुरुवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. कोट्यवधी रुपयांच्या आसपासची रक्कम गॅलक्सी नावाच्या संस्थेने न भरल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम हडपली की भरलीच नाही, याची माहिती प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांनी मागविली आहे.
आठ वर्षांपूर्वीचे व आजचे वेतन, त्यानुसार सरसकट गोळाबेरीज केली तर काही कोटींच्या आसपास ती रक्कम जाते. मागील ८ वर्षांपासून १२५ कर्मचारी संगणक आॅपरेटर म्हणून गॅलक्सी एजन्सीमार्फत कार्यरत आहे. कोऱ्या व्हाऊचरवर त्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. साडेनऊ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर सध्या आरटीजीएसने जमा होते. मात्र, पालिकेतून साडेसोळा हजार रुपयांची रक्कम प्रतिकर्मचारी घेतली जाते. संबंधित एजन्सी कुणाची आहे. मालक कोण आहे. कधीपासून हा सगळा गैरप्रकार सुरू आहे, याची माहिती प्रभारी कामगार अधिकारी तथा विधि अधिकारी अपर्णा थेटे यांना देता आली नाही. मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे त्यांनी आज पालिकेत धाव घेतल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याचे बिंग फुटले. या सगळ्या गैरव्यवहारात कामगार अधिकाऱ्यांपासून लेखा विभागातील यंत्रणेसह आयटी विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. इक्बाल नावाची व्यक्ती सुपरवायझर म्हणून काम पाहत असल्याचे समोर आले आहे.
महाराणा एजन्सी, बजरंग एजन्सी आणि गॅलक्सी या तीन संस्थांमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा पालिका घेत आहे. गॅलक्सीचा कर्ता धर्ता कोण याची माहिती कामगार अधिकारी थेटे यांनादेखील नाही. मग त्यांनी आजवर संस्थेने सादर केलेल्या बिलांना मंजुरी का व कशासाठी दिली, असा प्रश्न आहे.
महापौरांचा संतापप्रिन्सिपल एजन्सी म्हणून गॅलक्सीसोबत मनपाचे नाव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर पीएफ, ईएसआय,भत्त्यांची रक्कम मनपाला द्यावी लागेल. दोन महिन्यांनी सदरील कंपनीसोबतचा करार संपणार आहे. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन नाही. फेबु्रवारी व मार्चचे बिल थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने हा प्रकार समोर आल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी संताप व्यक्त केला. गॅलक्सीच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले.