औरंगाबाद : शहरात शासकीय, महापालिकेच्या मालकीचे भूखंड बळकावणारी मोठी टोळी सक्रिय आहे. जुन्या कागदपत्रांच्या आधारावर स्वत:चे नाव लावून देण्याचे प्रकार समोर येत आहे.
नंदनवन कॉलनी भागातील तब्बल १२ हजार चौरस फूट जागा बळकावण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला होता. प्रशासनाला याची कुणकुण लागताच पी. आर. कार्डवरील त्यांच्या नोंदी काढून महापालिकेचे नाव लावण्यात आले.
नंदनवन कॉलनीतील सर्व्हे क्रमांक २९, ३० मधील भूखंड मालक यासीन खान मोहमद खान यांनी नगर परिषदेकडून लेआऊट मंजूर करून घेतले. या लेआऊटमधील १२ हजार चौरस फूट खुली जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. या खुल्या जागेवर महापालिकेने नावच लावले नाही. नगर भूमापन कार्यालयात मूळ मालकाचेच नाव होते. त्यामुळे त्यांच्या वारसांनी दोन वेगवेगळ्या व्यक्तींना जागा विकली. त्या विक्रीची नोंद (फेर) ३६१९ करण्यासाठी १६ एप्रिल २०१४ मध्ये दाखल केले. दुसरे फेर ३७४३ मधील प्रस्ताव २८ ऑगस्ट २०१४ रोजी दाखल केला. या बेकायदेशीर फेराच्या विरोधात महापालिका प्रशासनाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. नगर भूमापन क्रमांक ७३४ मधील मूळ मालकाचे नाव रद्द करून मनपाचे नाव लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला. मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. गजानन मापारी यांनी काम पाहिले.