छत्रपती संभाजीनगर : मनपा कार्यक्षेत्राच्या विस्तारामुळे आजूबाजूच्या खेड्यांचे रुपांतर आता हळूहळू स्मार्ट शहरात होत आहे. चिकलठाणाही असेच बदलले आहे. स्मार्ट मनपा शाळेत तर डिजिटल एलईडी बोर्डवर शाळकरी मुले धडे गिरवत आहेत. फक्त वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.
जालना रोडवर असलेल्या या चिकलठाणा गावात शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून, औद्योगिक क्षेत्रामुळे कामगारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यवसाय तसेच शेतीतील उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. ज्यांनी पिके घेण्यावर भर दिलेला आहे, अशी बहुतांश कुटुंबे नागपूर, नाशिक, मुंबई आदी बाजारपेठांत कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाठवतात. या गावातील एक मोठी उणीव म्हणजे खेळाचे मैदान व उद्यान नाही. वृद्धांना तर शतपावली करणे वाहतुकीमुळे शक्य होत नाही.
स्मार्ट वर्कसाठी हातभार...कचरू नवपुते, साहेबराव कावडे मामा, रवी कावडे, ज्योती नाडे यांनी या वॉर्डाचे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या काळात त्यांनी विकासात्मक बदल आणले. शाळांचा विकास झाला. पेव्हर ब्लॉकचा रस्ता बदलून सिमेंटच्या रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार आहे.- ज्योती नाडे, माजी नगरसेविका
दवाखान्यात फक्त ओपीडीच सुरू...आरोग्य सेवेसाठी मनपाचे ५० खाटांचे आरोग्य केंद्र तयार करण्यात आले. पण पुरेशा मनुष्यबळाअभावी सध्या केवळ ओपीडीच चालविली जात आहे. स्थानिक नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागते. अंतर्गत रस्त्याची स्थिती सुधारण्याची गरज आहे.- नीलेश कावडे
पाणी कमी दाबाने...पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुधारावा.- लक्ष्मण गुरुखेल
पायी रस्ता ओलांडणे धोक्याचे..जालना रोड हायवे असल्याने वाहतुकीची वर्दळ खूप असते. शिफ्टप्रमाणे कामगारांची ने- आण केली जाते. त्यात स्कूलबसचीही भर पडते. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने रस्त्यावर अडथळा करून उभी राहतात.- माजी नगरसेवक रवि कावडे
गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ?बाजारतळासमोर आणि इतर ठिकाणी गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहतूक पोलिसांना टाळण्यासाठी निवासी वसाहतीतून वाहने पळविली जातात. यातून अपघात होण्याची भीती आहे.- अमोल गिरी