सिडको एन ६ येथील आदर्श बँकेसमोर सकाळी खातेदारांनी गर्दी केली होती. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. आम्ही वर्तमानपत्रात बातम्या वाचून आलो आहेत. आयुष्याची पुंजी बँकेत एफडीत ठेवली आहे. ती जर बुडाली तर आम्ही कंगाल होऊ यासाठी एफडी मोडण्यासाठी आलो आहेत, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. मात्र, या खातेदारांनी स्वत:चे नाव सांगण्यास नकार दिला. खातेदारांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण पाहून व्यवस्थापकांनी बँकेसमोर फलक लावला. त्यात लिहिण्यात आले की, ‘दैनिकांमध्ये छापून आलेल्या बातमीचा व बँकेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्यामुळे कृपया ग्राहकांनी गैरसमज करून घेऊ नये’ असे स्पष्ट करण्यात आले पण खातेदार रांगेत उभे होते. काहीजण व्यवस्थापकाकडे जाऊन चौकशी करत होते. त्या सर्वांना कॉफी पाजली जात होती व माहिती दिली जात होती. काहीजण मात्र खात्यातील रक्कम काढून घेताना दिसले. त्यांना रक्कम दिली जात होती. किती जणांनी आज बँकेतून रक्कम काढली, असे विचारताच व्यवस्थापक सुनील पाटील म्हणाले की, काढणाऱ्यांपेक्षा खात्यात रक्कम जमा करण्यासाठी जास्त खातेदार आले आहेत, वर्तमानपत्रात खुलासा करण्यात येईल, असे म्हणत जास्त बोलण्यास नकार दिला. बँकेच्या हडको, कोकणवाडी शाखेतही ग्राहक चौकशीसाठी आल्याचे दिसून आले.
आदर्श बँकेत पैसे काढण्यासाठी खातेदारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:02 AM