लातूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्यांकडील चलन तुटवडा वाढला आहे. या वाढत्या चलन तुटवड्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्ड असणारे ग्राहक आपल्या घरगुती किराणा आणि इतर साहित्याची छोटी-मोठी खरेदी करण्यासाठीही मॉलमध्ये जाऊन करीत आहेत. त्यामुळे गल्ली-बोळातील छोट्या दुकानदारांचे खरेदी-विक्री व्यवहार चांगलेच थंडावले तर मॉलमधील गर्दी गेल्या आठ दिवसांत ८० टक्क्यांनी वाढली आहे. किराणा आणि भुसार मालाच्या व्यापाराचे गाव असलेल्या लातूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गल्लीबोळांमध्ये छोटी-छोटी दुकाने स्थिरावली आहेत. परंतु, या सर्व दुकानांवर चलन तुटवड्याचा फटका बसतो आहे. एटीएममधून वा बँकांमधून नागरिकांना रोकड पुरेशा प्रमाणात मिळत नाही. इकडे बाजारातून घरातील दैनंदिन व्यवहारासाठी अनेक छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी करावी लागते. छोट्या वस्तू हव्या असल्यास जवळच्या दुकानातून घेण्याच्या सवयी लोकांना होत्या. परंतु आता खिशात रोकडच कमी असल्याने पर्याय नसलेले नोकरदार वर्ग आणि एटीएम कार्डधारक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या किराणा आणि इतर साहित्यांच्या खरेदीसाठी थेट मॉल गाठत आहेत. गेल्या आठ दिवसात आपल्या मॉलमधील खरेदीदारांची गर्दी ८० टक्क्यांनी वाढली असल्याचे लातुरातील एका मॉलचालकाने सांगितले. ‘आॅनलाईन ट्रान्झेक्शन’ मध्येही लातूर शहरात वाढ झाली आहे. बँकांमध्ये गर्दी असतानाही आॅनलाईन ट्रान्झेक्शनसाठी अर्ज ग्राहकांकडून येत असल्याचे एचडीएफसीचे शाखाधिकारी महादेव मघे यांनी ‘लोकमत’मध्ये सांगितले.
मॉलमध्ये गर्दी वाढली; छोट्या दुकानांवर बंदची वेळ
By admin | Published: November 17, 2016 12:58 AM