- मोबीन खान
वैजापूर (औरंगाबाद ) : ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ योजनेत ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, टपाल कार्यालयात दररोज पालकांची झुंबड उडत आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे सांगून सर्वसामान्य पालकांची लूट करण्यात येत आहे. आश्चर्य, म्हणजे अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असतानाही आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक अर्ज तालुक्यात विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कथित योजनेचा ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायत अणि टपाल कार्यालयात पालक मोठी गर्दी करीत आहेत. तालुक्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या नावावर दहा हजारापेक्षा अधिक बोगस अर्जांची विक्री झाली आहे.
तालुक्यातील अनेक झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून, त्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपालाद्वारे पाठविण्यासाठी एका व्यक्तीला जवळपास शंभर ते दीडशे रुपयांचा खर्च येत आहे. या अर्जामध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून, त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुलीला २ लाख रुपये मिळणार असल्याचाही उल्लेख केला आहे. अर्जासोबत असलेल्या पाकिटावर भारतसरकार, महिला एवं बालविकास मंत्रालय, शांतिभवन, नवी दिल्ली असा पत्ता छापण्यात आलेला आहे. योजनांच्या माहिती अभावी सर्वसामान्यांची लूट कशी होते, याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजना’ या योजनेच्या नावावर सर्वसामान्य जनतेची होणारी लूट प्रशासनाने चौकशी करून तात्काळ थांबवावी, योजनेबाबत योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
टपाल कार्यालयासमोर अर्ज पाठविण्यासाठी गर्दीया योजनेतून दोन लाख रुपये थेट अनुदान मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. दरम्यान, कें द्र सरकारची अशी योजना नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले; परंतु ग्रामीण भागात या योजनेंतर्गत विद्यार्थिनींसाठी दोन लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार असल्याची बातमी पसरताच विविध गावांतून विद्यार्थिनी व महिला टपाल कार्यालयासमोर अर्ज पाठविण्यासाठी गर्दी करीत असून, प्रत्येक जण आपला अर्ज भरण्यासाठी धडपडत आहे.
१) सदरील नोंदणी फॉर्मची आम्हाला काहीच माहिती नसून शासनाकडून असे काहीच परिपत्रक आमच्या कार्यालयात आलेले नाही. त्यामुळे पालकांनी असे फॉर्म भरू नयेत. -मनीष दिवेकर, गटशिक्षणाधिकारी.
२) मुलींना दोन लाख रुपये मिळणार म्हणून मुली अणि पालक दररोज शाळेत बोनाफाईड मिळवण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा व पालकांचाही वेळ वाया जात आहे. -मनोज सोनवणे, शिक्षक
३) ही योजना दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार अणि उत्तराखंडमध्ये लागू आहे. महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना लागू नाही, त्यामुळे पालकांनी असे फॉर्म भरू नयेत. तालुक्यात ज्या झेरॉक्स सेंटरवर असे फॉर्म विक्री होत आहेत त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. -डॉ. संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी
४) दररोज हजारो फॉर्म ‘बेटी बचाओ-बेटी पढओ’चे टपाल कार्यालयातून दिल्लीला पाठविले जात आहेत. -बी. के. शेखरे, पोस्ट मास्टर, वैजापूर