वाळूज महानगर : वाळूज महानगरातील छोट्या पंढरपुरात शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. विठु माऊलीचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या वारकरी दिंड्यांमुळे संपूर्ण पंढरपूर भक्तीसागरात बुडाले. भाविकांनी विठ्ठल चरणी लिन होऊन यंदा तरी चांगला पाऊस पडू दे, असे विठुरायाला साकडे घातले.
आषाढी एकादशीनिमित्त छोट्या पंढरपुरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जवळपास ७ लाख भाविक येत असतात. शुक्रवारीही पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा जनसागर लोटला होता. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटींनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे व त्यांच्या पत्नी अंजली सावे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला.
पहाटे ५ वाजता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड व त्यांच्या पत्नी सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते महाभिषेक व महाआरती करुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यात्रेनिमित्त येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाळूज पंचक्रोशीसह औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अहमदनगर, श्रीरामपूर आदी भागांतून वारकरी दिंड्या व भाविकांचे जत्थे येत होते.
दुपारनंतर भाविकांनी अलोट गर्दी केल्याने मंदिर परिसरासह औरंगाबाद-नगर महामार्गावर दुतर्फा दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वळदगाव मार्गे येणाºया भाविकांचीही मोठी संख्या असल्याने पंढरपूर-वळदगाव रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलला होता. पंढरपूर ते नगर नाका, पंढरपूर ते वाळूज व औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर, रांजणगाव, सिडको सर्व रस्ते गर्दीने गजबजले होते. रात्री उशिरापर्यात भाविकांचा ओघ सुरुच होता.
भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समिती व पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी व दिंडीतील वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान रात्री ८ वाजता ह.भ.प. हरिशरण गिरी महाराज यांचे किर्तन झाले.