औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय दलाई लामा रविवारी दुपारी १२.४५ वाजता चिकलठाणा विमानतळावरून चार्टर विमानाने दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी उपासक-उपासिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत आपल्या निर्मळ हास्याने दलाई लामा यांनी सर्वांचा निरोप घेतला.
पूजनीय दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत नागसेनवनातील पीईएसच्या क्रीडा संकुलावर २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान जागतिक धम्म परिषद पार पडली. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर चार्टर विमानाने दलाई लामा यांचे शहरात आगमन झाले होते. ३ दिवसांच्या परिषदेनंतर रविवारी दुपारी ते दिल्लीला रवाना झाले. विमानतळावर आगमन होताच प्राधिकरणातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
दलाई लामा यांचे सान्निध्य मिळावे, म्हणून उपासक-उपासिकांनी एकच गर्दी केली होती. विमानतळावर प्रवेश केल्यापासून, तर विमानात बसेपर्यंत दलाई लामा यांनी अनेकांशी संवाद साधला. अनेकांच्या डोक्यावर हात ठेवत होते. अनेकांना ते दुरूनच हात उंचावून प्रतिसाद देत होते. यावेळी अनेक जण त्यांच्यासोबतचा हा क्षण मोबाईलमध्ये कैद करीत होते. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह अधिकारी-कर्मचाºयांची उपस्थिती होती. यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.