औरंगाबाद : सोमवारपासून शहरातील सर्व व्यवहार, बाजारपेठ यासोबतच उद्यानेही उघडण्यात आली. तब्बल दीड वर्षानंतर उद्यानांचे प्रवेशद्वार उघडताच सकाळी नागरिकांनी गर्दी केली. दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानातील गर्दी कमी झाली. उद्यानात मात्र मास्कचा वापर बंधनकारक असून, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
शहरातील सर्व उद्याने, मैदाने, क्रीडांगणे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यानासह विविध उद्यानांत बच्चे कंपनीसह ज्येष्ठ नागरिकांनी प्रवेश केला. सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत उद्याने उघडी ठेवली जाणार आहेत. या संदर्भात माहिती देताना उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, सिद्धार्थ उद्यानासह इतर सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. तब्बल दीड वर्षानंतर उद्यानाचा दरवाजा उघडला आहे. यापूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी माॅर्निंग वॉकची सवलत देण्यात आली होती. उद्याने उघडताच ज्येष्ठ नागरिकांची मैफल जमली, तर बालगोपाळांनी खेळण्यासह दंगामस्ती सुरू केली. सिद्धार्थ उद्यानात सकाळपासून २२०० ते २५० नागरिकांनी फेरफटका मारला. तसेच इतर उद्यानांमध्येही बालगोपाळ खेळण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. उद्यानात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असून, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर सक्तीचे करण्यात आले आहे. उद्यानांमध्ये दिवसभर नागरिकांची वर्दळ दिसून आल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.