औरंगाबाद : कोरोना तपासणीसाठी महापालिकेने शहरात तब्बल ३६ केंद्रे उभारली आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आहेत त्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिक तपासणीसाठी गर्दी करत असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडत आहे. एमआयटी, किलेअर्क, पदमपुरा आणि एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तपासणीला गर्दी होत आहे.
शहरात दररोज किमान ४ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ताप, सर्दी किंवा अंगदुखी असल्यास नागरिक स्वतःहून महापालिकेच्या तपासणी केंद्रांवर येत आहेत. मागील वर्षभरातील हा सकारात्मक बदल महापालिकेसाठी सुखावह आहे. मागील वर्षी सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या तपासणीसाठी चक्क नकार देत होते; परंतु यातून नवी डोकेदुखी पालिकेला झाली आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्याच ठिकाणी नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी करू नये, असे वारंवार आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. मात्र, त्याचा किंचितही परिणाम नागरिकांवर दिसून येत नाही. शहरातील चार मोठ्या सीसीसीवर नागरिक कोरोना तपासणीसाठी गर्दी करीत आहेत. पदमपुरा येथील केंद्रावर अक्षरशः लांबलचक रांगा लागत आहे. या रांगा महापालिकेसाठी चिंतेत भर घालणाऱ्या ठरत आहेत. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र सहा टीम तयार करून दिल्या. शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र सहा टीम करण्यात आल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र टीम आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पाच पथके तैनात आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही तपासणीची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, त्या ठिकाणी नागरिक तपासणीसाठी जाण्यास तयार नाहीत. जिथे पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेतात तिथे गर्दी होत आहे.
कोणत्या केंद्रावर तपासणीसाठी गर्दी
केंद्र -२२ मार्च - २३ मार्च -२४ मार्च - २५ मार्च -२६ मार्च
एमजीएम- २७३- २५१- २८५- २८९- २९८
एमआयटी -२४४ -४१२ -२५६ -२६७ -२७५
किलेअर्क - २०१ - १६८ - १९५ -१२३ - १३५
पदमपुरा - ३१६ -२७२ -४१६ -३१२ -३५७