औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रवासी वाहतूक परवानगीविना खोळंबली होती. आता कोरोनाचा आलेख कमी झाल्याने अनलाॅकचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रेल्वे आणि बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे.
शहरातून पहिल्या दिवशी १८५ बस प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बसमधून जवळपास पाच हजारांवर प्रवासी प्रवास करत आहेत. बहुतांश प्रवासी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. दोन दिवसांपासून रेल्वेस्थानकावरही प्रवासी वाढले आहेत. नंदिग्राम व शताब्दी या दोन रेल्वे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. सध्या औरंगाबाद स्थानकावर सतरा गाड्यांचे अपडाऊन सुरू आहे. दररोज अडीच हजारांच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनाकाळात हाताला काम नसल्यामुळे अनेक कामगार गावाकडे गेले होते, ते पुन्हा कामावर परतत आहेत. विवाह समारंभ तसेच विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांचा जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवास सुरू आहे. सध्या रेल्वेचे बुकिंग केवळ ऑनलाइन केले जात आहे. प्रवाशांची तपासणी करण्यावर देखील भर दिला जात आहे. खबरदारी बाळगली नाही तर तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे अनेक जण स्वतःला सुरक्षित प्रवास कसा करता येईल, यादृष्टीने काळजी घेत आहेत.
अत्यावश्यक कामासाठी प्रवास...
सर्व खबरदारी घेत रेल्वे गाड्या सुरू आहेत. प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. तिकीट खिडकी सुरू करण्यात आली नाही. पूर्वीपेक्षा प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या - येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दोन गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
_रेल्वे अधिकारी.
बस निर्जंतुकीकरण केले जाते, प्रवाशांनाही मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवासी संख्या वाढलेली आहे. १८५ बस सोमवारी सोडलेल्या आहेत. कामगार प्रवासी बसस्थानकावर येत आहे.
-अरुण सिया (एसटी विभाग नियंत्रक)
दोन महिन्यांनंतर महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागत आहे. नातेवाइकाचा विवाह असल्यामुळे बसने प्रवास करावयाचा आहे. पूर्वी पास काढल्याशिवाय जाता येत नव्हते, आता ते सहज शक्य झाले आहे.
-अण्णासाहेब पाखरे, प्रवासी
कामानिमित्त बाहेरगावी जात आहे आहे. काम बंद होते त्यामुळे गावाकडे आलो होतो. आता परत कामासाठी बाहेरगावी जायचे आहे.
- नंदू आराक (रेल्वे प्रवासी)
बसच्या फेऱ्या
१८५
प्रवासी
५०००
धावणाऱ्या रेल्वे
१७
प्रवासी
२५००
मुंबईला जाणारे अधिक...
मुंबईकडे प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून, रेल्वेस्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ वाढलेली दिसत आहे. जिल्ह्यासह जवळच्या तालुक्यात जाणाऱ्या बससाठी प्रवासी गर्दी करीत आहेत. कामानिमित्त कामगार औद्योगिक क्षेत्रात येत आहेत. यांची संख्या बऱ्यापैकी दिसत आहे.
(793 डमी)