सोयगाव : स्थावर मालमत्तेतून वाट्यावर येणारे घर नावावर करून देण्याचा तगादा लावणाऱ्या वृद्ध महिलेचा ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, यात जामनेर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.सोयगाव शहराजवळ बनोटी रस्त्यावर गवळणीच्या नाल्याजवळ दि. १३ आॅगस्ट रोजी एका महिलेचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळले होते. पोलिसांनी प्रेताची विल्हेवाट लावून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदरील प्रेताचे वर्णन व सोबत पोलिसांना सापडलेल्या साहित्याची माहिती वर्तमानपत्रातून वाचून मयताच्या मुलाने सोयगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दाखविलेल्या वस्तूवरून संबंधिताने मयत महिला सकूबाई साहेबराव पाटील (वय ६०, रा. अमळनेर, जि. जळगाव) ही माझी आई होती व ती दि. ९ आॅगस्ट रोजी अमळनेर येथून पाचोरा येथे माझ्याकडे येत होती; परंतु १४ आॅगस्टपर्यंत आई न आल्यामुळे मी येथे आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याचे रक्त नमुने व मयत महिलेचे दात तपासणीसाठी मुंबई येथे पाठविले. यावरून संबंधित इसम मयत महिलेचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. मयत महिलेचा मुलगा कैलास साहेबराव पाटील (रा. पाचोरा, जि. जळगाव) याच्या फिर्यादीवरून आरोपी सुपडू ऊर्फ मधुकर राजाराम तायडे, राजेंद्र सुपडू तायडे (दोघे रा. पळासखेडे, ता. जामनेर) व त्यांच्या कामावरील सुकलाल कामा बदिले (रा. गंगापूर गारखेडा, ता.जामनेर) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या तिघा आरोपींनी अमळनेर येथून मुलाकडे जात असलेल्या सकूबाईस ९ आॅगस्ट रोजी पारोळा बसस्थानकावरून आम्ही तुला पाचोऱ्यास घेऊन जातो, असे सांगून बोलेरो जीप (क्र. एम.एच. १९ २८५८) मध्ये बसवून तिच्याजवळील मोबाईल व ४० हजार रुपये रोख रक्कम घेऊन तिचा ठेचून खून केला व प्रेत सोयगावजवळील गवळणीच्या नाल्यात फेकून दिले. पो. नि.घाटेकर, फौजदार भांडवले, सुरडकर, पवार यांनी अधिक तपास करीत आहेत. मयत सकूबाईचा मोबाईल आरोपी सुकलाल बदिले याच्याजवळ दिसल्याचे फिर्यादी कैलास पाटील याने पोलिसांना सांगितले. सायबर क्राईमचे सी.टी. तांदळे यांची तपासात मदत घेऊन तिन्ही आरोपींचे कॉल डिटेल्स काढले असता ९ ते १० आॅगस्ट या कालावधीत एकमेकांच्या जास्त संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज सोयगाव न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आ.ई. शेख यांनी २९ सप्टेंबरपर्यंत सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मालमत्तेच्या वादातून महिलेचा ठेचून खून
By admin | Published: September 23, 2014 1:23 AM