औरंगाबाद : तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोसळलेल्या घराच्या भिंतीखाली दबून पाच महिन्याचा चिमुकला दगावला . ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हर्सूल परिसरातील कानिफनगरात घडली. पियूष विलास म्हस्के असे मयत बालकाचे नाव आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, विलास म्हस्के हे पत्नी आणि पाच महिन्याच्या पीयूषसह कानिफनगर येथे कांताबाई सुरे यांच्या पत्र्याच्या खोलीत किरायाने राहातात. सोमवारी सकाळपासून विलास हे कामानिमित्त घराबाहेर होते. तर घरी असलेल्या त्यांच्या पत्नीने झोपलेल्या पीयूषला घरातील पलंगावर टाकून अंगणात भांडी घासत बसली होती. सायंकाळी साडेचार पावणेपाच वाजेच्या सुमारास खोलीची ओली भिंत अचानक कोसळली. भिंत पडल्याच्या आवाजाने चिमुकल्याची आई घरात पळाली. तेव्हा चिमुकला विटा मातीखाली दबल्याचे पाहुन तिने हंबरडा फोडला.
यामुळे घरमालकासह शेजारील लोक मदतीसाठी धावले काहींनी अग्निशामक दलाल फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान मोहन मुंगसे यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तेथील लोकांनी वीट आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या पियुषला बाहेर काढण्यात आले. मात्र बाळाला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याचे पाहुन मोहन मुंगसे यांनी अग्निशामक बंबाच्या वाहनातून चिमुकल्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत विलास म्हस्के होते. अपघात विभागातील डॉक्टरांनी पियुषला तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्सूल ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.