औरंगाबाद : टोकाचा वाद झाल्यानंतर त्याने पत्नी कविताचा गळा आवळला व डोक्यात मोठा दगड घातला. एवढ्यावरच न थांबता रॉडने जबरदस्त प्रहार करून तिला ठार केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले आणि तीन वर्षांच्या मुलीच्या डोळ्याजवळ ठोसा मारल्याने तिच्या डोळ्याजवळ काळीनिळा व्रण झाला.
रक्ताने माखलेले हातपाय धुऊन शांत डोक्याने स्कूटी घेऊन पसार झालेला आरोपी सिद्धेश गंगासागर त्रिवेदी घटनेला ४० तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमधेल फ्लॅटमध्ये कविता त्रिवेदी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करून त्यांचा पती पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता समोर आली होती. मृताचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्धेशविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात कविताचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानुसार कविताचा कशाने तरी गळा आवळण्यात आला. नंतर तिच्या डोक्यात जोरदार प्रहार करून खून करण्यात आल्याचे समोर आले. तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत. यावरून अत्यंत निर्दयी आणि अमानुषपणे कविताला ठेचून मारण्यात आले. कविताच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पिसादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकेपोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक ठुबे, कर्मचारी रवींद्र साळवे, अजित शेकडे, सोपान डकले, दीपक देशमुख, दीपक सुरासे, अण्णा गावंडे आणि स्था.गु. शाखेच्या अधिकाऱ्यांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
सिद्धेशला अनुकंपातत्त्वावर मिळाली होती नोकरीसिद्धेशचे वडील आणि आई औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे अनुकंपातत्त्ववर त्याला बाजार समितीने लिपिक पदावर नोकरी दिली होती.
कविताच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांना केले कॉलमुलगी व जावई फोन उचलत नाहीत. यामुळे तिच्या आई-वडिलांनी कविताच्या शेजारी कुटुंबाला मोबाइलवर सायंकाळी ५ वाजता कॉल केला. तेव्हा त्यांनी घराला बाहेरून कुलूप आहे, तसेच आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना संशय आल्याने अवस्थी कुटुंब लगेच औरंगाबादला येण्यास निघाले. त्यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहिले असता कविताचा खून झाल्याचे दिसले. रात्री ८ वाजता शेजाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.