छत्रपती संभाजीनगर : क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात शहरातील शेकडो बँक खात्यांचे कागदपत्रे, एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक पंजाबमध्ये पाठवले गेले. ते पाठवताना रॅकेटच्या सूत्रधारांच्या सूचनेनुसार ते खोटे नावे, अपूर्ण पत्त्यावर पाठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर, गुजरातनंतर आता पंजाब कनेक्शन उघडकीस आल्याने देशभरात या घोटाळ्याची व्याप्ती असून, आशिया खंडातही याची पाळेमुळे पसरल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी यात नव्याने सुरतच्या निशांत रमणीक कालरिया (३१) व जेमिश रसिक सालिया (३०) यांना अटक केली. त्यापूर्वी रविवारी रॅकेटमध्ये रोख रकमेची जबाबदारी असलेल्या हर्षल मुकेश काछडिया (१९) याला अटक करण्यात आली होती. या तिघांसह उत्सवकुमार चंदू भेसानिया (२३, रा. सुरत), ऋषिकेश भागवत (२३, रा. एन-६), अनुराग घोडके (२१, रा. जाधववाडी), ज्ञानेश्वर पठाडे (२४, रा. बिडकीन) यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने अमीर काझी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर उत्सवकुमार, ऋषिकेश, अनुराग, ज्ञानेश्वर यांची न्यायालयीन कोठडीत तर नव्याने अटक केलेले निशांत, जेमिश व हर्षलला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. बोस यांनी दिले.
१६ मोबाइल, १ लॅपटॉप अन् ८३ जीबी डेटाअटकेतील आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी आतापर्यंत १६ मोबाइल, १ लॅपटॉप जप्त केला. आरोपी सातत्याने टेलिग्रामर व्हर्च्युअल आयडीद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहून बँक खात्यांच्या माहितीची देवाणघेवाण करत होते. यातून पोलिसांनी जवळपास ८३ जीबी डेटा जप्त केला. त्यात विदेशी क्रमांकदेखील मिळून आले असून, आशिया व आखाती खंडातील देशांमध्ये संपर्क झाल्याचे उघडकीस आले.
विदेशात ये-जा, उद्देश संशयास्पदमंगळवारी ताब्यात घेतलेला निशांत एमसीए तर जेमिश बीसीए उत्तीर्ण आहे. दोघेही वेब डेव्हलपर आहेत. १९ वर्षीय हर्षल रोख रक्कम काढून या दोघांना सुपुर्द करत होता. त्यानंतर निशांत, जेमिश त्या रोख रकमेची पुढे विल्हेवाट लावत होते. दोघांचे अनेकदा विदेश दौरेदेखील झाल्याने ते कुठल्या देशात, कधी गेले, कुठल्या उद्देशाने गेले याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरने शहरात खाते उघडून खात्याशी संबंधित कागदपत्रे, वेलकम किट, एटीएम कार्ड पंजाबमध्ये पाठवले. परंतु त्यावर खोटी नावे व पत्ता असून ते कोण स्वीकारते, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.
नोटीसवरून वकिलांचा आक्षेपतपास अधिकाऱ्यांनी खाते उघडून देणारा बँक एजंट शनैश्वर लक्ष्मण जाधव (२४, रा. मुळशी) याला चौकशीसाठी बोलावून नोटीस बजावून सोडण्यात आले. न्यायालयात ॲड. अभयसिंग भोसले यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. एकाच गुन्ह्यात सात जणांना वेगळी व एकाला वेगळी वागणूक का, असा प्रश्न करत भोसले यांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले.