वाळूज महानगर : सिडकोतील निवासी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीवर वडगावातील नागरिकांकडून अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरी केली जात आहे. हा प्रकार उघडकीस येताच पाणी चोरी रोखण्यासाठी सिडको प्रशासनाने अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला आहे.
सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने वडगाव कोल्हाटी मार्गे ३५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकली आहे. मात्र या मुख्य जलवाहिनीवरच वडगावातील अनेक नागरिकांनी अनधिकृत नळजोडणी घेतली आहे. यामुळे जलवाहिनीची चाळणी झाली असून, अनेक ठिकाणी गळती लागली आहे.
परिणामी सिडकोतील द्वारकानगरी, साराभूमी, साई प्रेरणानगरी, सारा समृद्धी, सुखकर्ता अपार्टमेंट, गंगा अपार्टमेंट, सारा किर्ती, साईनगरी, बालाजीनगरी, साई प्रतीक्षा, साई प्रसाद, गोल्डन पार्क, सारा आकृती, सारा व्यंकटेश, साराभूमी अपार्टमेंट आदी जवळपास ३० ते ३२ सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाण्याविषयी नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने जलवाहिनीची पाहणी केली. या पाहणीत वडगावातील अनेकांनी सिडकोच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळजोडणी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने पाणीचोरी थांबवून सिडकोतील वसाहतीला अनधिकृत नळजोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईसाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तही मागितला आहे.
ग्रामपंचायतीचे अजब उत्तरगावाला पाणीपुरवठा करण्याची जवाबदारी ग्रामपंचायतीची आहे. असे असले तरी अनधिकृत नळजोडणी तोडण्यासंदर्भात सिडकोने दिलेल्या पत्राला ग्रामपंचायतीने अजब उत्तर दिले आहे. गावात पाणीटंचाई असल्याने नळाचे शुल्क देण्यास नागरिक तयार असून, सदरील नळजोडणी तोडून नये, असा मासिक बैठकीत ठराव घेतल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. पत्रावर सरपंच उषा साळे व ग्रामविकास अधिकारी एम.बी. ढाकणे यांच्या स्वाक्षºया आहेत.